मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. प्रेमासाठी १९७७ मध्ये दिल्ली ते गोटेनबर्ग असा सायकल प्रवास करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीची भूमिका शाहरुख साकारणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान सुमारे दोन दशकानंतर पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींच्यासोबत काम करणार आहे. या चित्रपटाची जुळवाजुळव गेली चार वर्षे झाली भन्साळी करीत आहेत आणि यात शाहरुख मुख्य भूमिका साकारणार हे स्पष्ट झाले आहे.
या चित्रपटाची कथा सत्यकथेवर आधारित आहे. भारतीय कलाकार पीके महानंदिया यांची भेट १९७५ मध्ये स्वीडनची पर्यटक शार्लोट वॉन शिडविन हिच्याशी दिल्ली येथे झाली होती. तेव्हा तिने पीके यांना तिचे चित्र रेखाटण्यास सांगितले. येथून त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरूवात झाली. प्रेमासाठी पीके यांनी १९७७ मध्ये दिल्ली ते गोटेनबर्ग असा सायकल प्रवास केला होता. या कथेला संजय लीला भन्साळी मोठ्या पडद्यावर भव्य आणि रोमँटिक पध्दतीने दाखवणार आहेत.