मुंबई - सोनू सूद गेल्या काही महिन्यापासून आपल्या दातृत्वाबद्दल कौतुकास पात्र ठरला आहे. प्रवाशी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी केल्यानंतर त्याने आपला हात पोलिसांसाठीही पुढे केलाय. या अभिनेत्याने महाराष्ट्र पोलिस कर्मचार्यांना 25,000 फेस शील्ड मास्क दान केले आहेत.
कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेक स्थलांतरित कामगारांसाठी देवदूत ठरलेला सोनू सूद खऱ्या आयुष्यातही हिरो ठरला आहे. मुंबई पोलिसांना सोनूने केलेल्या मदतीची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी सोनूने केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानले आहेत.
“आमच्या पोलिस कर्मचार्यांना 25,000 #feShields देण्याच्या तुमच्या उदार योगदानाबद्दल मी सोनू सूदजी यांचे आभार मानतो,” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर सोनू सूदच्या फोटोसह लिहिले आहे.
गृहमंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सोनूने लिहिले आहे, "तुमच्या शब्दांमुळे खरोखरीच सन्मानित झालोय. माझे पोलीस बंधू आणि भगिणी हे खरे हिरो आहेत. ते करीत असलेल्या कौतुकास्पद कामासाठी मी हे करु शकलो इतकेच. जय हिंद.#OurRealHeroes @DGPMaharashtra."
हेही वाचा - पुस्तकातून 'जीवन बदलणारा' अनुभव सांगणार सोनू सूद
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना मदत करण्याचा त्याचा 'जीवन बदलणारा' अनुभव सोनू सूद आता जगाला सांगणार आहे. यासाठी तो पुस्तक लिहिणार असून हे पुस्तक पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रकाशित करणार आहे.
"माझा विश्वास आहे की मी याच कार्यासाठी या शहरात आलो आहे. मला परप्रांतीयांना मदत करण्यासाठी उत्प्रेरक बनविण्याबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छितो. मुंबईत माझे हृदय धडकत असले तरी, या मोहिमेनंतर मला असे वाचते की मी यूपी, बिहार, झारखंड, आसाम, उत्तराखंड आणि इतर अनेक राज्यातील खेड्यांचा रहिवासी आहे. तिथे मला अनेक नवीन मित्र सापडले आहेत आणि त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. माझ्या जीवनातील या अनुभवाच्या गोष्टी कायमस्वरुपी पुस्कात लिहिण्याचा निर्णय घेतला आहे," असे तो म्हणाला.