मुंबई -शिप ऑफ थीसस, तुम्बाड सारख्या ‘आऊट ऑफ द बॉक्स’ चित्रपटांमधून चाकोरीबाहेरील भूमिका साकारत सोहम शहा चित्रपटसृष्टीत स्थिरावला. अशा भूमिका साकारताना अभिनेत्याची कसोटी लागते. अशाच एका चाकोरीबाहेरील भूमिकेतून सोहम शहा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता सोहम शहाने 'महारानी' मध्ये एका राजकारण्यांची भूमिका निभावली असून त्याच्या मते हा अनुभव विलक्षण होता. सोहम शहा एक असा अभिनेता आहे, ज्याने पडद्यावरील उत्तम अभिनयाने आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महारानी'मधील त्याचे काम कौतुकास्पद आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिका एकमेकांहून खूप भिन्न असून हे त्याच्या उत्तम अभिनय क्षमतेबाबत खूप काही सांगून जाते.
हल्ली ‘कॅरॅक्टरायझेशन’ साठी खूप मेहनत घेतली जाते. पोशाख, भाषा, लहेजा, शारीरिक ठेवण आदींवर मेहनत घेतली जाते. या भूमिकेसाठी, सोहमने केवळ योग्य भाषा आणि ती बोलण्याची पद्धतच शिकला नाही तर व्यक्तिरेखेसारखे दिसण्यासाठी स्वतःमध्ये शारीरिक बदल देखील केले आहेत. काही किलो वजन वाढवले असून व्यक्तिरेखेला शोभतील अश्या करारी मिशा देखील वाढवल्या आहेत. एकूणच या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी अभिनेत्याच्या या लूकला पसंती दिली असून सुरुवातीपासूनच तो मालिकेत प्रभाव पडतो.
‘महारानी’ ही बिहार च्या राजकारणावर आधारित वेब सिरीज असून यात एका ‘अंगुठा छाप’ गृहिणीचा मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये, सोहम एका बिहारी राजनेत्याच्या भूमिकेत असून त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी 'महारानी'च्या प्रदर्शनाबाबत खूपच उत्साहित आहे. ही खरोखरच एक लक्षणीय सिरीज आहे. यातील भीमा भारतीची भूमिका साकारत असताना माझ्यातली नवीन बाजू समोर आली आहे, ज्याबद्दल मी स्वतःच अनभिज्ञ होतो. आणि हे केवळ सुभाष सरांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. 'महारानी'मध्ये देखील मी काहीतरी नवे करण्याचा माझा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल." 'महारानी'मधील त्याचा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा करणारा सोहम शहा एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी 'फॉलन'मध्ये दिसणार आहे.