मुंबई- बॉलिवूडमधील स्टार चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सध्या निर्माणाधीन असून तो कायदेशीर अडचणीत सापडला आहे. प्रॉडक्शन थांबवण्याच्या उद्देशाने गंगूबाईचा मुलगा बाबूजी रावजी शाह यांनी निर्माते भन्साळी, आलिया भट्ट आणि रिपोर्टर जेन बोर्जेस यांच्या विरोधात २० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
माफिया क्विनच्या भूमीकेत आलिया
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया एक माफिया क्विनची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिला कामठीपुराची मॅडम देखील म्हटले जाते. हा चित्रपट 'द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. हुसेन जैदी यांनी मूळ संशोधनावर हे पुस्तक लिहिले आहे.
गंगूबाईंचा मुलगा न्यायालयात
निर्माते अद्याप चित्रपटाचे शूटिंग थांबवलेले नसले तरी गंगूबाई यांचा मुलगा बाबूजी रावजी शाह यांनी एसएलबी, त्याचा बॅनर भन्साळी प्रॉडक्शन, आलिया, लेखक हुसेन जैदी आणि रिपोर्टर जेन बोर्जेस यांच्या विरोधात 20 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
गंगुबाईच्या मुलाचा नेमका आक्षेप काय आहे?
एका अग्रगण्य वेबसाईटच्या अहवालानुसार, गंगूबाईंचा मुलगा बाबूजी यांनी त्यांच्या याचिकेत हे पुस्तक मानहानीकारक, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. बाबूजी यांनी विशिष्ट भाग हटवणे आणि चित्रपटाची निर्मिती थांबवणे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
न्यायालयाची पुढील सुनावणी
या प्रकरणाची पहिली सुनावणी २२ डिसेंबर रोजी झाली आणि मुंबई दिवाणी कोर्टाने प्रतिवादींना परत येण्यासाठी ७ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
संजय लीला भन्साळी आणि वाद
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना विरोध होण्याची ही काही पहिली वेळ नाही. 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या वेळीदेखील पेशव्यांच्या वंशजांनी असाच वाद तयार केला होता. २०१८ मध्ये जेव्हा 'पद्मावत' चित्रपट आला तेव्हा संपूर्ण भारतभर निदर्शने झाली होती. हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार मोठ्या राज्यात सिनेमावर बंदी घातली तेव्हा चित्रपट निर्मात्याला त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागला होता.