मुंबई- बॉलिवूड गायक मिका सिंग सध्या चांगलाच वादात सापडला आहे. पाकिस्तानातील एका लग्नाला हजेरी लावल्यामुळे त्याच्यावर बॉलिवूडमध्ये पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला आहे. मात्र आपली चूक लक्षात आल्यानंतर मिकाने या चुकीचं परिमार्जन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तो सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना ५० घरं बांधून द्यायला तयार झाला आहे.
मिका पुरग्रस्तांसाठी बांधणार ५० घरं मिकाने पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयाच्या लग्नात हजेरी लावून परफॉर्म केलं होतं. ही बाब उघड झाल्यानंतर, बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या ‘ऑल इंडिया सिने एप्लॉईज असोसिएशन’ आणि ‘वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज असोसिएशन’ या दोन्ही संघटनांनी स्वतंत्र पत्रक काढून मिकावर बहिष्कार घालण्याचं आवाहन संपूर्ण इंडस्ट्रीला केलं आहे.
त्यानुसार त्याच्यासोबत कोणतंही काम न करायची ताकीद संबंधित प्रॉडक्शन हाऊस, म्यझिक कंपनी, निर्माते, दिग्दर्शक यांना देण्यात आली आहे. त्याच्यासोबत सुरू असलेली सर्व कामे रद्द करण्याची विनंती म्युझिक कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध चिघळलेले असताना आणि मायभूमीच्या रक्षणासाठी अनेक जवान सीमेवर शहीद होत असताना देशापेक्षा पैशाला महत्त्व दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र असतो. मिकाने ‘येरे येरे पैसा’ या अमेय खोपकर यांच्या सिनेमात गाणं गायलं होतं. त्यामुळे या संकटकाळात मदत करण्याची विनंती मिकाने अमेय यांना केली. त्यानुसार कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पूरपरिस्थितीत सढळ हस्ते मदत करून चूक सुधारण्याची सूचना अमेय यांनी मिकाला केलेली दिसते. त्यानुसार मिकाने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आपण ५० घरं बांधून द्यायला तयार असल्याचं लगेचच जाहीर केलं आहे.
यापूर्वीही शाहरूख खानच्या ‘रईस’ या सिनेमात माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीला घेतल्यामुळे त्याला ५ कोटी रुपये वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाग पाडलं होतं. त्यानुसार आता मिकालाही केलेली चूक दुरूस्त करण्यासाठी अमेय खोपकर यांनी ही संधी दिली आहे. आता यानंतर त्याच्यावरील बहिष्कार मागे घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.