महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता शुभंकर तावडेचे ‘स्पेशल’ बर्थ डे सेलिब्रेशन! - shubhankar tawde birthday

अभिनेता शुभंकर तावडेने विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. शुभंकरने या मुलांसोबत केक कापला. त्यांना भेटवस्तू दिल्या. आणि एक छोटेखानी गेटटुगेदर पार्टी साजरी करून मुलांसह आनंद साजरा केला

shubhankar tawde celebrates birthday with special children
सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता शुभंकर तावडेचे ‘स्पेशल’ बर्थ डे सेलिब्रेशन!

By

Published : Oct 28, 2021, 6:37 AM IST

मुंबई - मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सामाजिक बांधिलकीसुद्धा जपताना दिसत असतात. बरेच कलाकार आपला वाढदिवस जंगी पार्टी करून साजरा करण्यापेक्षा समाजातील उपेक्षित घटकांसमवेत साजरा करण्यात धन्यता मानतात. आनंद वाटल्याने द्विगुणित होतो, हे तितकेच खरे आहे. याचा नुकताच प्रत्यय आला अभिनेता शुभंकर तावडेला. कागर फेम शुभंकर तावडेने आपला वाढदिवस ‘स्पेशल’ पद्धतीने साजरा केला.

शुभंकरने विशेष मुलांसह आपला वाढदिवस साजरा करताना आनंद वाटला. कोरोना महामारीच्या काळात वाढदिवस कसा साजरा करावा याचे एक उत्तम उदाहरण आहे. मुंबईतल्या उमंग चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष मुलांसह शुभंकरने आपला वाढदिवस साजरा केला. शुभंकरने या मुलांसोबत केक कापला. त्यांना भेटवस्तू दिल्या. आणि एक छोटेखानी गेटटुगेदर पार्टी साजरी करून मुलांसह आनंद साजरा केला.

या पार्टीत शुभंकरसोबत मुलं अगदी मिसळून गेली होती. त्याच्यासोबत मुलांनी मराठी गाण्यांवर डान्सही केला. शुभंकर ह्या अनुभवाबद्दल म्हणाला,” मोकळ्या आभाळात उडणाऱ्या पक्षाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. हा निरागस आनंद पाहून मी ठरवलं की, वर्षातून एकदा तरी त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांच्याकडून खूप सकारात्मक उर्जा घेऊन आता मी कामाला लागणार आहे.”

शुभंकरने मुलांना छोट्या कुंड्या-बियाणाचं वाटप केलं. शुभंकर म्हणाला, ”मला रोपं-झाडं लावायला खूप आवडतं. मुलांवर छोट्या-छोट्या गोष्टीतून संस्कार करावे लागतात. मी त्यांना बियाणं कसं पेरावं आणि त्याची कशी घ्यावी. मग रोपं कसं उगवतं हे समजावून सांगितल्यावर ते गिफ्ट त्यांना खूप आवडलं.”

'गेल्या एक-दिड वर्षात आपल्या सगळ्यांच्या शारिरीक-मानसिक स्वास्थ्यावर घरात बसून खूप परिणाम झाला. मग या विशेष मुलांवर या वातावरणाचा कसा परिणाम झाला असेल? त्यामुळेच आता बंधनं शिथिल झाल्यावर त्यांची शाळा उघडताना त्यांना आनंदित करावे. या विचाराने मी माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्यासाठी छोटेखानी पार्टी ठेवली', असेही तो म्हणाला. शुभंकर तावडेचे ‘8 दोन 75’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फोर ब्लाइंड मेन’ हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा -Aryan Khan Drug Case : आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details