वर्षभराच्या विरामानंतर आता सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वातही नव्या घडामोडी घडू लागल्या आहेत. आखून दिलेल्या नियमांचे पालन करून मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला वेग आला आहे. होळी आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधून नुकतीच ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाची घोषणा झाली आहे.
‘पिग्मॅलिअन’वर आधारलेलली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म जगभर चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एक वेगळी फुलराणी या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ही कलाकृती चित्रपटाच्या रूपात साकारण्याचे काम सध्या जोरात सुरू झालं आहे.
‘फुलराणी’ ही कलाकृती प्रत्येक मराठी मनाच्या अतिशय जवळची आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावरची फुलराणी कोण असणार? नेमकी कशी असणार? याविषयी प्रत्येकालाच कुतूहल आहे. मात्र त्याआधी ‘फुलराणी’ पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञांची नावे नुकतीच एका पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली आहेत.