मुंबई- तेलुगु सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'साहो' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. या सिनेमाविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रभास आणि श्रद्धा कपूरचे चाहते उत्सुक आहेत. अशात चित्रपटाबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.
'साहो'च्या मुंबईतील चित्रीकरणाला आता सुरूवात झाली आहे. या चित्रपटात श्रद्धा आणि प्रभासशिवाय निल नितीन मुकेशही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यानेच आपल्या सोशल मीडियावर श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक सुजितसोबतचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
अखेर 'साहो'च्या मुंबईतील चित्रीकरणाला सुरूवात, असे कॅप्शन देत निलने हा फोटो शेअर केला. दरम्यान, 'साहो'मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे़. हा चित्रपट तेलुगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा साहोव्यतिरिक्त ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.