गेल्या महिन्यात, व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा, राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ उत्पादन आणि सामग्री प्रकाशित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर चित्रपटसृष्टीत आणि शेट्टी-कुंद्रा कुटुंबात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. महिन्याभरानंतरही या प्रकरणाची परिस्थिती जैसे थे आहे. या आघातानंतर शिल्पा शेट्टी शूटिंगला गेलेली नाहीये. ती सुपर डान्सर चॅप्टर ४ या डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करीत होती. परंतु तिच्या नवऱ्याला अटक झाल्यानंतर उठलेल्या जनक्षोभानंतर शिल्पाचे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते, शूटिंगला जाणे तर लांबची गोष्ट.
त्याच सुमारास शिल्पा शेट्टी अभिनित ‘हंगामा २’ प्रदर्शित होणार होता आणि शिल्पाने प्रेक्षकांना भावनिक आवाहन केले होते की चित्रपट बनताना अनेक लोकांची मेहनत असते म्हणून माझ्यामुळे या चित्रपटाला अव्हेरू नका. तसेच तिने सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट टाकली होती की सेलेब्रिटी म्हणून तिची Never complain, never explain’ ही पॉलिसी आहे. माझ्याबद्दल कृपया वावड्या उठवू नका आणि माझ्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल असे काहीही, पुष्टी केल्याशिवाय, छापू नका. परंतु आता ती या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कोविड-१९ मदत निधी गोळा करण्यासाठी होणाऱ्या आभासी कार्यक्रमातून सार्वजनिक जीवनात परतण्याच्या बातम्या आहेत. या कार्यक्रमात देशी-विदेशी सेलिब्रिटीज सहभागी होणार असून याचे सूत्रसंचालन भारतीय अभिनेता राजकुमार राव करणार आहे.