मुंबई - 'शिकारा' चित्रपटातील 'शुक्राना गुल खिले' हे गाणे प्रसिध्द झालंय. या गाण्यात लग्नाच्या विधीतील काश्मिरी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. चित्रपटाच्या दिगदर्शकांनी या गाण्याची सुंदर झलक सोशल मीडियावर शुक्रवारी प्रसिध्द केली आहे.
विधु विनोद चोप्रा यांनी आपल्या ट्विटरवरुन या गाण्याच्या रिलीजची घोषणा केली. त्यांनी लिहिलंय, ''गतकाळातील विश्वासार्ह काश्मिरी पंडितांच्या विवाह प्रसंगाचे गाणे. गाणे प्रसिध्द झाले.''
काश्मिरी संगीताच्या तालामध्ये असलेल्या या सुंदर गाण्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील मुख्य व्यक्तीरेखांचा विवाह प्रसंग चित्रीत करण्यात आलाय. काश्मिरी लोकसंगीताचे वैभव अधोरेखीत करणारे हे लोकगीत बशीर शरीफ यांनी लिहिलंय.
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये वादक पारंपरिक वाद्यावर ताल धरलेले दिसत असून इतर लोकांनी टाळ्यांनी सुरेल साथ दिल्याचे दिसते.
'शिकारा-अ लव्ह लेटर फ्रॉम काश्मीर', ही कथा काश्मीरच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काश्मीरच्या एका समुदायाला बेघर करण्यात आले होते. ३० वर्षानंतरही ते आपल्या घरी परतू शकले नाही. या चित्रपटातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. सादिया शांतीची भूमिका साकारत आहे तर आदिल शीवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत करण्यात आली आहे.