मुंबई - संगीतकार ए. आर. रहमानने त्याच्याविरूद्ध काम करणाऱ्या इंडस्ट्रीतील “टोळी” बद्दल खुलासा केल्यानंतर निर्माते दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रहमानची प्रतिभा ओळखण्यात बॉलिवूड कमी पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. रहमान यांची आंतरराष्ट्रीय मान्यता ही "बॉलिवूडमधील मृत्यूचे चुंबन" असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेखर कपूर यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''तुम्हाला माहिती आहे तुमची समस्या काय आहे, एआर रहमान? तुम्ही गेला आणि ऑस्कर मिळाले. ऑस्कर म्हणजे बॉलिवूडमधील मृत्यूचे चुंबन आहे. यातून हे सिध्द होते की तुमच्या जवळ बॉलिवूडच्या तुलनेत जास्त प्रतिभा आहे..."
संगीतकार रहमान यांनी अलिकडेच एक मुलाखतीत म्हटले होते की, त्यांच्याबद्दल अनेक खोट्या बातम्या आणि अफवा फिरत आहेत, ज्यांनी त्यांच्या सिनेमामधील चांगल्या कामाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. नुकत्याच एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रहमान म्हणाले: "मी चांगल्या चित्रपटांना नाकारत नाही, परंतु मला असे वाटते की अशी एक टोळी आहे, जी गैरसमजांमुळे काही चुकीच्या अफवा पसरवित आहे."