मुंबई- अभिनेत्री शर्वरी वाघ 'बंटी और बबली 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनयाबरोबरच तिला संगीतातही रुची आहे. त्यामुळे संगीतातही स्वतःला आजमावायला आवडेल असं तिने म्हटलंय. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याचे तिने सांगितलंय.
शर्वरी वाघ म्हणते, ''मला गाणे ऐकायला खूप आवडते. माझ्या खोलीत बसून जुनी गाणी कॅसेटवर ऐकायची सवय होती. त्यानंतर सीडीवर गाणी ऐकायला लागले. त्यानंतर एमपी ३ चा जामाना आला, एकंदरीत संगीताबद्दल माझा ओढा जास्त आहे. जेव्हा रिकामी असते तेव्हा मी संगीत ऐकत असते.''
संगीताचीही आवड
ती पुढे म्हणाली, "जेव्हा मी दहा वर्षांची होते तेव्हा माझ्या आईने मला कीबोर्डच्या वर्गात प्रवेश दिला आणि मी ते शिकतच राहिले. मला अभिनयाची आवड आहे. मला चित्रपटांमध्ये काम करणे आवडते. मला कीबोर्ड वाजविणे देखील आवडते. संगीत आणि अभिनय याचे एकत्र काम करण्याची संधी मिळाल्यास हे माझ्या स्वप्नातील प्रोजेक्टपेक्षा कमी असणार नाही.
'बंटी और बबली 2' या चित्रपटात 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदी, सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि शर्वरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 'बंटी और बबली' या चित्रपटाचा सीक्वल आहे.
आदित्य चोप्राने निर्माण केलेल्या 'बंटी और बबली' चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी यांच्या आघाडीच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. 'बंटी और बबली'मधील अलिशा चिनॉयने म्हटलेले व ऐश्वर्या रायने डान्स केलेले 'कजरा रे' हे गाणे २००५ मधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.