मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाच्या दुःखद बातमीने केवळ सिनेक्षेत्रात नाहीतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातमीनंतर दुःख व्यक्त केलं. तसेच शाळेत असताना जेजुरी येथे दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यावेळेस काही मित्रांना घेऊन सायकलवरून थेट जेजुरी गाठली आणि त्यावेळेस लांबून का होईना, मात्र दिलीप कुमार यांना पाहण्याचा योग आला अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
शाळेत असताना जेजुरीमध्ये दिलीप कुमार यांचे शुटींग पाहायला गेलो होतो, शरद पवारांनी जागवली आठवण - Sharad Pawar recalled Dilip Kumar
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रध्दांजली वाहाना दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राजकीय प्रवास सुरू असताना विधिमंडळ आणि राज्य सरकारातमध्ये काम करताना अनेक वेळा दिलीप कुमार यांच्या सोबत संपर्क झाला. यावेळी त्यांच्यासोबत एक वेगळं नातं तयार झालं. दिलीप कुमार यांची प्रचंड लोकप्रियता होती. केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांचे चाहते होते. त्यामुळे नेहमीच त्यांच्या आजूबाजूला मोठी गर्दी असे, असं म्हणत शरद पवारांनी आठवणींना उजाळा दिला. आज जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या जाण्याने दुःख झाले आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी श्रद्धांजली शरद पवार यांनी दिलीप कुमार यांना वाहिली आहे.