मुंबई- शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग चित्रपट सिनेमागृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाहिदनं माध्यमांशी मनमोकळ्या संवाद साधला आहे.
..म्हणून 'कबीर सिंग' आहे शाहिद कपूरच्या फिल्मी करिअरमधील पहिला रिमेक
'कबीर सिंग' हा चित्रपट आपल्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमधील पहिला रिमेक असल्याचं शाहिदनं म्हटलं आहे. हा रिमेक करण्यामागचं कारणही शाहिदनं सांगितलं आहे.
'कबीर सिंग' हा चित्रपट आपल्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमधील पहिला रिमेक असल्याचं त्यानं यावेळी म्हटलं. यामागचं कारणही शाहिदनं सांगितलं आहे. एखाद्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करताना कलाकार असा विचार करतो, की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. मात्र, 'कबीर सिंग'च्या बाबतीत मी खूप लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. अनेकांनी माझ्याकडे येत हा एक उत्तम सिनेमा असून त्यांचा आवडता चित्रपट असल्याचंही म्हटलं. यानंतर मी जेव्हा 'अर्जून रेड्डी' पाहिला तेव्हा मलाही अगदी असंच वाटलं आणि मी चित्रपटाला होकार दिल्याचं शाहिदनं म्हटलं.
यासोबतच तेलुगू प्रेक्षकांचीही 'अर्जून रेड्डी' चित्रपटाला पसंती मिळाली होती. त्यामुळे, याच्या रिमेकमधून देशभरातील प्रेक्षकांसमोर जाण्याची संधी मिळत असल्यानंही हा चित्रपट आपल्यासाठी खास असल्याचं शाहिदनं म्हटलं आहे. दरम्यान 'कबीर सिंग' हा दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. संदीप वंगा रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.