मुंबई - देशात सायबर गुन्हेगारांना बळी पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार शबाना आझमी यासुद्धा सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणात बळी पडल्या आहेत. या संदर्भात अभिनेत्री शबाना आझमी यांनी सायबर पोलिसांकडे अद्याप तक्रार नोंदवलेली नाही.
अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यासोबत घडलेला प्रकार उघडकीस आणला आहे. काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांनी ऑनलाइन दारू मागवण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेस त्यांनी आगाऊ रक्कमसुद्धा ऑनलाईन भरलेली होती. मात्र ऑनलाइन पैसे भरूनही त्यांना घरपोच लिकर डिलिव्हरी झाली नाही. यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शबाना आझमीयांनी ट्विटर अकाउंटवर त्यांनी केलेल्या ऑनलाइन पेमेंट बद्दलचा दाखला दिला आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर सदरच्या एका संपर्क क्रमांकावर त्यांनी फोन केला असता त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर मुंबई पोलिसांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आव्हान केले होते.