कमाल आर खान, जो केआरके म्हणून ओळखला जातो, नेहमीच आपल्या जहरी व्यक्त्यव्यांनी न्यूजमध्ये असतो. ‘बिग बॉस’ सारख्या रियालिटी शोमधून प्रसिद्धी मिळविलेला केआरके स्वतःला अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक म्हणवतो. काही फ्लॉप बी-ग्रेड चित्रपटांनंतर त्याने आपला एक यू-ट्यूब चॅनेल सुरु केला आणि तेथे नवीन प्रदर्शित चित्रपटांची परीक्षणं करू लागला. या परिक्षणाची खास बात म्हणजे तो जवळपास प्रत्येक चित्रपटाला फाडून खातो आणि आपल्या तिखटजाळ प्रतिक्रियांनी भल्याभल्या स्टार्सना नको-नको ती नावं ठेवतो. अशाच एका रिव्ह्यूमुळे अभिनेता सलमान खानने त्याच्यावर मानहानीचा खटला भरला असून तो कोर्टापुढे आहे. परंतु केआरकेचे नेहमीचे उद्योग सुरूच असून तो अजूनही चित्रपट रिव्ह्यूजमध्ये त्यांची लक्तरं काढताना दिसतो. तसेच त्याचा मिका सिंग या गायकासोबत सुद्धा ‘पंगा’ सुरु असून यू-ट्यूबने केआरकेच्या त्या व्हिडिओला, मिकाला एका जनावराच्या नावाने संबोधिल्यामुळे, आठवड्याभरची स्थगिती दिली आहे. थोडक्यात केआरके चित्रपटसृष्टीतील कोणालाही भीक घालत नाही असे त्याचे म्हणणे आहे.
चित्रपटसृष्टीतील अनेकजण म्हणतात की ते केआरके मनावर घेत नाहीत परंतु त्याच्या व्हिडीओजना मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांचे धाबे दणाणले आहे. गेल्यावर्षी सुशांत सिंग राजपूतच्या अकाली आणि संशस्यास्पद निधनानंतर आम जनता बॉलिवूडमधील घराणेशाहीला शिव्या घालू लागली. ‘आतले-बाहेरचे’ हा वाद सुरु झाला व ‘स्टार-किड्स’ ना बॉयकॉट करा ही मागणी जोर धरू लागली. त्याचसुमारास बॉलिवूडमधील मोठमोठ्या नावांबद्दल नकारात्मक चर्चाही सुरु झाली होती आणि केआरके ने आपल्या व्हिडीओजमधून त्याला खतपाणीही घातले असे अनेक बॉलिवूडकरांचे म्हणणे आहे. खरंतर त्याचसुमारास केआरके च्या मुद्द्यांना, सुशांतच्या मृत्यूमुळे उद्विग्न झालेली, सामान्य जनता सपोर्ट करताना दिसली आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये याचे पडसाद उमटू लागले आणि ‘बॉलिवूड वाचवा’ असे बोलले जाऊ लागले.