मुंबई- कलेच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा उभारण्यात सरकार कमी पडल्याची खंत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केली. 'स्माईल प्लिज' या सिनेमाच्या ट्रेलर आणि म्युझिक लाँचच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कलेच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा उभ्या करण्यात सरकार कमी पडले - सतीश आळेकर
मुंबईत 'स्माईल प्लिज' या सिनेमाच्या ट्रेलर आणि म्युझिक लाँचच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलेच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा उभारण्यात सरकार कमी पडल्याची खंत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून करमणूक क्षेत्राची नक्की काय अपेक्षा आहे ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, करमणूक क्षेत्रातून दरवर्षी २२ हजार कोटींची उलाढाला होत असल्याचे सीसीआयच्या अहवालमध्ये येते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या इंडस्ट्रीला पायाभूत सुविधा म्हणून आपण नक्की काय देतो, याचा विचार करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागील ७० वर्षात फक्त विसलिंगवूडस आणि फिल्म इन्स्टिट्यूट अशा दोनच चांगल्या संस्था उभ्या राहिल्या आहेत. कला, गायन, नृत्य यांच्या शिक्षणासाठी पायभूत सुविधा उपलब्ध नसल्याने आपल्याकडे फक्त संघर्ष तयार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मेडिकल कॉलेजसाठी रुग्णालय आवश्यक असते. आयआयटीसाठी मोठा कॅम्पस हवा असतो. तशी कलेची गरज ओळखून त्यासाठी मूलभूत सुविधा उभ्या करण्याची गरज आहे. नुसते कोपऱ्यात तबला, पेटी देऊन कला विभाग सुरू करण्याची विचार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.