मुंबई - प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.
सरोज खान यांनी आपल्या चार दशकांच्या करियरमध्ये शाहरुख खान, काजोल, माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि करीना कपूर यांच्यासह असंख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी एकदा शाहरुख खानच्या कानाखाली थप्पड मारल्याचा एक किस्साही आहे. शाहरुखने याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.
शाहरुख म्हणाला होता, "मी माझ्या सुरुवातीच्या काळात मास्टर-जीबरोबर काम करत होतो आणि त्यावेळी मी जवळजवळ तीन शिफ्टमध्ये काम करायचो. एकदा मी त्यांना सांगितले की, मी सर्व कामांत कंटाळलो आहे. प्रत्युत्तरादाखल सरोजजी यांनी माझ्या गालावर प्रेमाने थप्पड मारली आणि म्हणाल्या की, माझ्याकडे बरेच काम आहे असे मी कधीही म्हणू नये.''
सरोज खान यांनी २००० हून अधिक गाण्यांचे कोरिओग्राफ केले आहे. त्यांच्या या कामासाठी त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.