मुंबई- सध्याच्या कोरोना काळात भारताची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अस्वस्थता माजविली आहे. औषधे, वैद्यकीय साहित्य आणि आता तर ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागल्याने सामान्य माणसाच्या समस्यांमध्ये वृद्धी होत आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आणि निर्मितीसंस्था शासनाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. नुकतेच स्टारडम मिळविलेली सारा अली खानसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसतेय. तिने कोविड रिलीफसाठी सोनू सूद च्या चॅरिटी फाउंडेशनमध्ये भरीव रकमेचे योगदान दिले असून, सोनू सूदने तिचे आभार मानले आहेत.
सोनू सूदने सोशल मीडियाद्वारे मानले साराचे आभार
देशात कोविडचे प्रकरणे वाढत असताना सारा अली खानने समाज माध्यमांचा वापर करीत आपल्या फॅन्समार्फत कोविड-पीडितांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर सोनू सूद फाउंडेशनतर्फे गरजूंसाठी अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स खरेदी करण्यासाठी एक भरीव रक्कम दान केली आहे. त्याचबरोबर इतर मदतींचा पाठपुरावा वाढविला आहे. तिच्या या आर्थिक योगदानाबद्दल साराचे आभार मानून सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, "धन्यवाद प्रिय सारा अली खान तुझ्या @सूदफॉउंडेशन मधील योगदानाबद्दल! तुझा अभिमान वाटतोय आणि असेच चांगले सामाजिक कार्य करत रहा. या कठीण काळात तू देशातील तरूणांना पुढे येण्यास व मदत करण्यासाठी प्रेरित केले आहे. तू एक ‘हिरो’ आहेस 🤗 @sara_ali_khan95”