मुंबई-2020 साली बॉलिवूड मधून एकामागून एक वाईट बातम्या येण्याचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाही. सारे काही सुरळीत सुरु आहे, असे वाटत असतानाच अजून एक धक्कादायक बातमी आली आहे. अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती आहे. दत्त कुटुंबातील कुणीही या बातमीला अद्याप दुजोरा दिला नसला तरीही संजय दत्तने मंगळवारी दुपारी टाकलेल्या एका पोस्टमुळे बॉलिवूड मध्ये ही चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग;उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता - bollywood latest news
सिने अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती आहे. संजय दत्त कर्करोगावरील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. संजयची आई नर्गिस यांना देखील रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यावेळी सुनील दत्त यांनी त्यांना उपचारासाठी अमेरिकेला नेले होते.
9 ऑगस्ट रोजी रात्री अचानक छातीत दुखायला लागल्याने संजय दत्तला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने त्याची कोविड चाचणी करण्यात आली. मात्र,ही चाचणी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी 10 ऑगस्ट रोजी त्याला साधारण वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर लगेच डिस्चार्ज घेऊन तो घरी परतला.
मंगळवारी संजय दत्तने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन एक पोस्ट केली. या पोस्ट मध्ये आपण काही दिवस बॉलिवूड मधून ब्रेक घेत असून उपचारासाठी थोडे बाहेर जाणार आहे, त्यामुळे याबाबत कुणीही उलट सुलट चर्चा करू नये, असे त्याने स्पष्ट केले. मात्र, तरीही या पोस्टमुळे मीडियात संजय दत्तला नक्की असे झाले तरी काय याची चर्चा सुरु झाली. अखेर बरीच शोधाशोध केल्यावर त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून त्यावरील उपचारासाठी तो लवकरच अमेरिकेला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता समोर आलेली ही माहिती खरी की खोटी याची पुष्टी जोवर दत्त कुटुंबातील कुणी करत नाही तोवर ही चर्चा अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे. संजयची आई नर्गिस यांना देखील रक्ताचा कर्करोग झाल्याने त्यांना देखील पती सुनील दत्त यांनी उपचारासाठी अमेरिकेला नेले होते.