मुंबई- बॉलिवूडचा डॅशिंग आणि बिनधास्त अभिनेता संजय दत्त आपल्या चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्यामुळे आणि वादांमुळेच चर्चेत राहिला. आजही संजू बाबाचं नाव घेताच अनेकांच्या समोर उभा राहतो त्याचा ड्रग्सच्या नशेत बुडालेला अवतार आणि तुरुंगातील प्रवास. आज संजू बाबाचा ६० वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया संजयच्या आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी
९ वर्षाचा असताना संजयनं पहिली सिगरेट ओढली होती. संजयचे वडील सुनील दत्त हे त्यांच्या मित्रांसोबत बसलेले असताना अनेकदा सिगरेट प्यायचे. हेच पाहून संजयने एकदा अॅश ट्रेमध्ये पडलेली आर्धी सिगरेट प्यायला सुरुवात केली. ही गोष्ट सुनील दत्त यांना माहिती होताच ते संजयवर खूप रागवले आणि त्यांनी संजयला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले.
आपल्या रॉकी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संजय पूर्ण वेळ नशेत असायचा. एका मुलाखतीत संजय म्हटला होता, की आईच्या उपचारासाठी न्यू यॉर्कला जाताना त्याने आपल्या पायातील चपलांमध्ये हेरोइन लपवून प्रवास केला होता. यावेळी संजयसोबत त्याच्या दोन बहिणी प्रिया आणि नम्रता यादेखील होत्या. ही माझ्याकडून झालेली खूप मोठी चूक होती, जर मी पकडलो गेलो असतो तर माझ्यासोबत माझ्या बहिणींनाही याची शिक्षा भोगावी लागली असती, असंही संजय म्हणाला होता.
संजय जेव्हा पुण्याच्या तुरुंगात होता, तेव्हा रक्षाबंधनला बहिण प्रिया दत्त या राखी बांधण्यासाठी गेल्या. यावेळी संजू बाबाने दोन वेळचं जेवण न करता ते कूपन जपून ठेवले आणि जेव्हा प्रिया यांनी राखी बांधली तेव्हा ते त्यांना गिफ्ट म्हणून दिले. जे प्रियाने आजही जपून ठेवले आहेत.
चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास संजू बाबाचा 'बाबा' हा पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजयने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर याशिवाय तो लवकरच 'प्रस्थानम' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयाशिवाय तो एक उत्तम गायकही आहे.