नवी दिल्ली - मॉडेल, अभिनेत्री, पत्नी, सून आणि आई अशा अनेक जबाबदाऱया पार पाडल्यानंतर आता समीरा रेड्डी एका नव्या भूमीकेत समोर येत आहे. समीरा लवकरच आपले एक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे 'वेस्टलँड' या प्रकाशन संस्थेने याबाबत घोषणा केली.
'इम्परफेक्टली परफेक्ट' असे नाव असलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून समीरा महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहे. या पुस्तकात तिने किशोरवयातील असुरक्षितता, मॉडेलिंग करताना आलेल्या अडचणी, बाळंतपणानंतर आलेला ताण आणि लठ्ठपणा याबाबत आलेले अनुभव मांडले आहेत. २०२१मध्ये हे पुस्तक प्रकाशित होईल.
'माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मला अनेक महिला आणि मुलींचे मेसेज येतात. तणावातून आणि न्यूनगंडातून बाहेर कसे पडू, याबाबत त्या विचारतात. त्यामुळे मी हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकाच्या माध्यमातून मी महिला आणि मुलींशी खरा व प्रामाणिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे,' असे समीरा म्हणाली.
सध्याच्या काळात महिलांवर आणि तरूण मुलींवर अनेक जबाबदाऱया आणि आव्हाने असतात. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता-करता अनेकजणी तणावात जातात. अशा महिलांसाठी समीराचे पुस्तक वाचने गरजेचे आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे 'वेस्टलँड' प्रकाशनाने म्हटले आहे.