मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" चित्रपटाच्या रिलीजला आता अजून विलंब होणार नाही. या चित्रपटाचे निर्मात्यांनी हायब्रीड रिलीज करायचे ठरवले आहे. यापूर्वी २०२० च्या ईदसाठी याचे नियोजन करण्यात आले होते.
कोविडची दुसरी लाट पसरली आहे आणि चित्रपट प्रदर्शनाचा व्यवसाय पुन्हा एकदा संपूर्ण भारतभर ठप्प झालाय. कोरोना साथीचा विपरीत परिणाम चित्रपट उद्योगावर झाला आहे. अशावेळी ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
बर्याच विलंबानंतर १३ मे रोजी ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" हा अॅक्शन-थ्रिलर रिलीज होणार आहे. स्टुडिओ पार्टनर झी यांच्यासमवेत या चित्रपटाची सहनिर्मिती करणार्या सलमानने हायब्रीड रिलीज मॉडेलची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हा चित्रपट एकाच दिवशी थिएटर आणि डिजिटल जगात रिलीज होईल.
सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओच्या निवेदनात म्हटले आहे की, “कोविड प्रोटोकॉलनुसार सुरू असलेल्या सर्व भारतीय राज्यांतील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट उपलब्ध असेल.”