सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट येऊ घातला असतो तेव्हा त्याची खूप हवा असते. ‘भाई’ चा ‘ऑरा’च इतका जबरदस्त आहे की त्याला किंवा त्याच्या चित्रपटाला दुर्लक्षित करताच येत नाही. ‘अंतिम’ हा चित्रपटही अपवाद नाही जरी त्यात सलमान खान ‘हिरो’ ची भूमिका साकारत नाहीये. सुपरहिट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ वर आधारित हा सिनेमा असून यात त्याचा ‘जिजाजी’ आयुष शर्मा मुख्य भूमिकेत असून सलमान त्यात इन्स्पेक्टरची भूमिका निभावतोय. यावेळेस तो पगडीधारक सरदार पोलीस अधिकारी असून कर्तव्यदक्ष आणि कामाप्रती इमानी ऑफिसर आहे.
‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदीत रिमेक बनवायला कारण काय होते असे सलमान खानला विचारण्यात आले तेव्हा आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम उपस्थित असलेल्या ग्रुपला संबोधित करत तो म्हणाला, “मी एका लेखकाचा मुलगा आहे. त्यामुळे कथेतील चांगलं-वाईट लगेच कळते. स्टोरीचा ‘कन्सेप्ट’ मी लगेच पकडतो. ‘मुळशी पॅटर्न’ च्या कथेचा गाभा मला खूप भावला ज्यात मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनही आहे. त्यातच या चित्रपटातील इन्स्पेक्टरची भूमिका मला आवडली आणि मी ती डेव्हलप करायला सांगितली. महेश (मांजरेकर) या मराठी चित्रपटासोबत जुळलेला होताच आणि त्यानेच याचे दिग्दर्शन केले आहे. मी यात शीख पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात आहे. सुरुवातीला आम्ही हरियाणा सदृश प्रांतातील कथानक दाखविणार होतो परंतु कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला. त्यामुळे तिथे जाऊन शूटिंग करणे शक्य नव्हते. तसेच शीख पोलीस इन्स्पेक्टर दाखविल्यामुळे या सिनेमाला पॅन-इंडिया स्वरूप मिळाले आहे. तो मराठी देखील बोलतो कारण तो महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालाय. मी त्या समाजाचा आब राखत ही भूमिका साकारली आहे, ‘सरदार इज किंग’ स्वरूपात. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल.”
सलमान खान म्हटलं की पडद्यावर रोमान्स असलाच पाहिजे. परंतु ‘अंतिम’ मध्ये सलमान खान ला हिरॉईन देण्यात आलेली नाहीये. त्या संदर्भात बोलताना त्याने सांगितले की, “सुरुवातीला माझ्यासाठी हिरॉईन निवडण्यात आली होती. खरंतर आम्ही काही दृश्ये आणि एक गाणं देखील चित्रित केलं होत. परंतु चित्रपटाच्या रशेस बघताना असे जाणविले की माझा रोमँटिक ट्रॅक कथानकात शिथिलता आणतोय. म्हणून आम्ही माझा रोमँटिक ट्रॅक हटविला. ‘त्या’ अभिनेत्रीला सॉरी म्हणालो आणि तिनेही आमच्या निर्णयाचा आदर करत काहीही खळखळ केली नाही. अर्थातच तिला माझ्या/आमच्या पुढच्या चित्रपटात नक्की घेणार आहोत. तिच्यावर आणि माझ्यावर चित्रित झालेले गाणे कदाचित स्वतंत्रपणे प्रदर्शित करू कारण ते माझ्या शीख गेट-अप मुळे दुसऱ्या कुठल्या चित्रपटात वापरता येणार नाही. आणि हो, (हसत) त्या अभिनेत्रीचं नाव आत्ता सांगणार नाही.”