कोरोना प्रादुर्भावामुळे मनोरंजनसृष्टीचे आर्थिक गणित खिळखिळे झाले होते. सिनेमाघरं तर आताआतापर्यंत बंद होती. परंतु आता ही महामारी आटोक्यात आल्यासारखी दिसतेय आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहांची टाळी उघडली जात आहेत. त्यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि स्टार्ससुद्धा आपापले चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यासाठी धडपडत आहेत. मोठ्या निर्मितीसंस्थांनी लगेचच प्रदर्शनाच्या तारखा घोषित केल्यापासून त्यांचा तिकीटबारीवर धंदा कसा होतो याचे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष असणार आहे. येत्या दिवाळीत दीडेक वर्षे प्रदर्शसाठी रखडलेला रोहित शेट्टी दिग्दर्शित व अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि कॅटरीना कैफ अभिनित ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार असून अख्खी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांनी सिनेमागृहांत पूर्वीप्रमाणे गर्दी करावी अशी अपेक्षा बाळगून आहे.
तसेच अनेक मोठमोठाले चित्रपट एकामागोमाग एक रिलीज होत असून प्रेक्षकांसाठी ती पर्वणी ठरेल असा अंदाज वर्तविला जातोय. यात ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स चा चित्रपटदेखील मोडतो. नुकतेच याचे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि नेटिझन्सनी त्याला भरपूर प्रेम दिलंय. या चित्रपटात सलमान खान तर आहेच परंतु त्याचा मेव्हणा आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटावर आधारित आहे. “सर्वचजण थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे. आता चित्रपटगृहे सुरु होत आहेत आणि काही चित्रपट मोठ्या पडद्यावरच जास्त मजा देतात. आणि ‘अंतिम’ हा त्याच पठडीतला चित्रपट आहे. महेश मांजरेकरने तो उत्तमरीत्या बनविला असून प्रेक्षकांना जो जरूर आवडेल. आयुष ने यातील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे आणि आम्ही सर्व ‘फायनल प्रॉडक्ट’ बद्दल समाधानी आहोत. आता प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला हवेत, अर्थात कोविडचे नियम पाळून.”