मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे. सुशांत आपल्यात नाही हे मान्य करणे बॉलिवडूमधील अनेकांना कठीण जात आहे. या घटनेनंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत. अलिकडेच सैफ अली खानने सांगितले की, सुशांतच्या निधनानंतर त्याची मुलगी सारा अली खानला मोठा धक्का बसला आहे.
सारा अली खानने 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिची जोडी सुशांतसिंह राजपूतसोबत होती.
सैफने एका आघाडीच्या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ''याबाबतीत सारा बोलू इच्छिते की नाही, हे मला माहिती नाही. परंतु ती खूप दुःखी असून तिला धक्का बसला आहे. सारावर सुशांतचा खूप प्रभाव होता. सुशांत खूप बुध्दिमान असल्याचे ती मला म्हणाली होती. तो कोणत्याही विषयावर बोलू शकत होता. फिट असण्यासोबतच तो मेहनती आणि चांगला अभिनेता होता.''