मुंबई- बाहुबली या सुपरहिट सिनेमानंतर प्रेक्षकांच्या प्रभासकडून प्रचंड अपेक्षा होत्या. अशात प्रभासचा ३५० कोटींचा बजेट असणारा साहो सिनेमा पाहाण्यासाठी प्रभासचे चाहते खूपच उत्सुक होते. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी प्रभासनं दोन वर्ष खर्च केले आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांची पुरती निराशा झाली आहे.
चित्रपटाची कथा -
चित्रपटाची कथा आणि याचा स्क्रीनप्ले प्रेक्षकांना पेचात पाडणारा आहे. अनेक घटना यात का दाखवल्या जात आहेत, याचा संदर्भच प्रेक्षकांना शेवटपर्यंत लागत नाही. त्यात अॅक्शनचा इतका भडीमार या चित्रपटात झाला आहे, की तो असह्य होऊन जातो. रिल लाईफमध्येही या गोष्टी न पटण्यासारख्या होतात आणि सिनेमा कंटाळवाणा होऊन जातो.
चित्रपटात प्रभास, श्रद्धा, जॅकी श्रॉफ आणि निल नितीन मुकेशसारखी तगडी स्टारकास्ट आहे, मात्र कलाकारांच्या गुणांचं, संधीचं आणि पैशांचं मोठं नुकसान चित्रपटामुळे झाल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषकांनी म्हटलं आहे. तर्कशून्य कथेसोबतच दिग्दर्शनातही अनेक त्रुटी आहेत. या सिनेमाला चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून केवळ दीड स्टार मिळाले आहेत.