मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री रिया चक्रवर्ती शनिवारी म्हणाली की ती दोन वर्षांनी कामावर परतली आहे. हा काळ तिच्या आयुष्यातील "सर्वात कठीण काळ" होता असे तिने म्हटलंय. 2012 पासून अभिनेत्री म्हणून काम करणारी रिया चक्रवर्ती 2020 मध्ये तिचा प्रियकर सुशांत सिंग राजपूत मृतावस्थेत सापडल्यानंतर वादळाच्या भोवऱ्यात सापडली होती.
दिवंगत अभिनेता सुशांतच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्या संपत्तीचा गैरवापर केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीवर केला. यामुळे तिच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले होते. रियाला भरपूर ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे तिला आपल्या कामातून ब्रेक घ्यावा लागला होता.
रिया चक्रवर्ती 2021 च्या थ्रिलर चेहरेमध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत शेवटची दिसली होती. तिने इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे ज्यात ती रेडिओ स्टेशनमध्ये दिसत आहे. तिने लिहिलंय, "काल, मी दोन वर्षांनी कामावर गेले. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व लोकांचे खूप खूप आभार. काहीही असो, सूर्य नेहमीच चमकतो. कधीही हार मानू नका.''
2020 मध्ये 'मेरे डॅड की मारुती' आणि 'जलेबी' सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात 28 दिवस तुरुंगात काढले होते. प्रखर मीडिया ट्रायलला सामोरे गेलेली हा अभिनेत्री सध्या जामिनावर बाहेर आहे.
हेही वाचा -शहनाझला वाटते, 'पक्ष्यांसारखे उडावे', व्हिडिओमुळे चाहते आनंदी