हैदराबाद - जगभरात वेगाने पसरत असलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एसएस राजामौली दिग्दर्शित मेगा-बजेट आगामी 'RRR' या पॅन इंडिया चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा देशातील सिनेमागृहे बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्मात्यांनी जोखीम न घेता चित्रपटचे रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
अगोदरच्या वेळापत्रकानुसार 'RRR' चित्रपट 7 जानेवारी रोजी रिलीज होणार होता. या चित्रपटाचे प्रमोसनही जोरदारपणे सुरू होते. स्वतः एसएस राजामौली , आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या टीव्ही शोमधून चित्रपटाचा प्रचार करीत होते. यापूर्वी हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. राजामौली आता चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
राजधानी दिल्लीतील वाढत्या केसेस पाहता सिनेमागृहांना टाळे लावण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जात आहे.रणवीर सिंगच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या '83' चित्रपटावर कोरोना विषाणूचा मोठा परिणाम झाला आहे. बॉक्स ऑफिसवर याचा विपरीत परिणाम झाला आहे.