कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला असताना भारतातील अनेक राज्यांत लॉकडाऊन लागला. परिणामी चित्रपटगृहे बंद करण्यात आली. काही चित्रपट जे प्रदर्शसाठी तयार होते आणि ज्यांनी चित्रपटगृहांत ते प्रदर्शित करण्याच्या तारखा घोषित केल्या होत्या, अशा आणि इतरही अनेक चित्रपटांना पुन्हा एकदा ओटीटीची कास धरावी लागली. टी-सीरिज आणि अबंडनशीया एन्टरटेन्मेंटने अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शेरनी’ सुद्धा त्यामध्ये मोडतो. हा चित्रपट आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.
टीझरद्वारे ‘शेरनी’ ची एक झलक सामायिक केल्यानंतर निर्मात्यांनी, टी-सीरिज आणि अबंडनशीया एन्टरटेन्मेंटने त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून त्यासोबतच चित्रपट १८ जून २०२१ ला प्रदर्शित होणार असण्याची घोषणाही केलीय. विद्या बालनचा फॉरेस्ट ऑफिसर लूक चर्चेत असून त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात विद्या बालनबरोबर शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज कबी अशा बहुमुखी कलाकारांचा समावेश आहे.
दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, "शेरनी ही एक गुंतागुंतस्तरीय कहाणी आहे. ती मनुष्यप्राणी आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांचा शोध घेते. विद्या बालन ही मध्यम-स्तरीय वन अधिकारी म्हणून काम करते, जी अडथळे व दबाव असूनही, आपल्या कर्तव्यात कसूर करीत नाही. वातावरणात संतुलन टिकवून ठेवण्यासाठी ती तिचे काम करत राहते. तिच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी एक उत्तम अनुभव होता. मला आशा आहे की अमेझॉन प्राइम व्हिडिओवर शेरनी प्रदर्शित झाल्यावर या कथेला विस्तृत आणि वैविध्यपूर्ण भारत आणि जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”