भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः। मज्जैत्र यत्रा: कुर्णवा: प्रोल्लो सान्ति पदे पदे ।। याचा अर्थ असा आहे की, 'हिरडस मावळाचे लोकप्रिय राजे बांदल माझी विजययात्रा यशस्वी करत करत प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवत आहेत’, असं ज्यांच्याबद्दल स्वत: छत्रपती महाराजांनी म्हटले आहे. हिरडस मावळामध्ये रायाजीराव बांदल आणि कोयाजीराव बांदल यांच्या रूपात स्वराज्याला जणू दोन हिरेच गवसले. शूरवीर, धाडसी, निडर, वचनाला जागणारे आणि राजांसाठी प्राणांची बाजी लावणारे असे कितीतरी गुण या बांदल बंधूंच्या अंगी ठासून भरले होते.
रायाजी-कोयाजी बंधूंचा थरारक लढा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर 'पावनखिंड' हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असणाऱ्या 'पावनखिंड'चा उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जोडीला आणखी दोन शूरवीरांची नावं अनाहूतपणे समोर येतात. शिवचरित्रातील या महत्त्वपूर्ण अध्यायातील दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि श्रीमंत रायाजीराव बांदल. पावनखिंडीचा रक्तरंजीत इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळणार आहे.
रायाजी-कोयाजी बंधूंचा थरारक लढा त्या काळरात्री बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू यांच्यासह रायाजीराव बांदल यांनी आपल्या ३०० कडव्या बांदल सेनेच्या साथीने घोडखिंड अडवून धरली आणि पराक्रमाची शर्थ करीत अखेरच्या श्वासापर्यंत गनिमांची वाट रोखून ठेवली. 'पावनखिंड' चित्रपटात बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाच्या निमित्तानं रायाजीराव-कोयाजीराव या दोन पराक्रमी बंधूंचा थरारक लढाही पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली असून, अंकित मोहन यांनी रायाजीराव बांदल तर अक्षय वाघमारे यांनी कोयाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे.
ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित 'पावनखिंड'ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. दिग्दर्शनासोबतच 'पावनखिंड' या चित्रपटाचं लेखनही दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दिसणार असून, मृणाल कुलकर्णी राजमाता जिजाऊ बनल्या आहेत. याखेरीज वैभव मांगले, हरीश दुधाडे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.
येत्या १८ फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -कॅटरिना कैफच्या मालदीवमधील फोटोंमुळे इंटरनेटवर जाळ