मुंबई - बॉलिवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख असलेला बहुगुणी दिग्दर्शक करण जोहर ५ वर्षानंतर दिग्दर्शनसाठी पुन्हा उतरणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने एक प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.
बर्थ डे बॉय रणवीरला वाढदिवसाची गिफ्ट
करण जोहरने नव्या चित्रपटाची घोषणा करीत असल्याचे सोशल मीडियावर कळवले आहे. त्याने एक व्हिडिओ जारी केला असून यात 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' या आगामी चित्रपटाची झलक दाखवली आहे. या चित्रपटात बर्थ डे बॉय रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. रणवीर सिंगच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाची घोषणा करुन करण जोहरने त्याला जणू वाढदिवसाची गिफ्टच बहाल केली आहे.
करण जोहरने पाच वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शनाच्या आपल्या आवडत्या कामाकडे वळायचे ठरवले आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टसह 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटाची कथा इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिली असल्याचे करण जोहरने सांगितले.
करण जोहरची थोडक्यात ओळख
करण जोहर हा एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक करण जोहर
करणने आदित्य चोप्राच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका करून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरूवात केली. १९९८ साली त्याने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खान व काजोल यांचे त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस मानले जाते. 'ऐ दिल है मुश्किल' हा त्याने ५ वर्षापूर्वी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता.
टीव्हीवरही करणची लोकप्रियता
चित्रपतसृष्टीसोबतच करणने टेलीव्हिजनवरदेखील आपला ठसा उमटवला. त्याचा 'कॉफी विथ करण' हा मुलाखत कार्यक्रम लोकप्रिय होता. तसेच 'झलक दिखला जा' या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये तो माधुरी दीक्षित व रेमो डिसुझा यांच्यासोबत तो परिक्षक होता.
हेही वाचा -सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर, नव्या संघटनेच्या निर्मितीची घोषणा