मुंबई- गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे जगभरात ‘डॉक्टर’ या संज्ञेला विशेष महत्व प्राप्त झाले. तसं बघायला गेलं तर आपल्या चित्रपटांतून ‘डॉक्टर’ची व्यक्तिरेखा, ‘अब दवा की नहीं दुआ की जरुरत है’ किंवा ‘अच्छा हुआ इन्हे वक्तपर लेके आये, थोडी देर हो जाती तो....’ असे किंवा तत्सम संवादांपुरती मर्यादित होती. डॉक्टर ही व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत घेऊन बनलेले चित्रपट हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतही नाहीत. जंगली पिक्चर्स एक नवीन चित्रपट घेऊन येताहेत जो ‘डॉक्टरी’ जीवनावर बेतलेला आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये जंगली पिक्चर्सने आपल्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली, ज्याचे नाव आहे ‘डॉक्टर जी’. यात आयुष्मान खुराना डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता त्याच्या जोडीला अजून एक ‘डॉक्टर’ जोडली गेलीय. ‘डॉक्टर जी’ मध्ये रकुल प्रीत सिंगची सुद्धा वर्णी लागली असून ती आयुष्मान च्या ‘सिनियर’ ची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटातून मेडिकल कॅम्पसमधील घडामोडी कॉमेडी रूपात सादर करण्यात येणार आहेत. आयुष्मान डॉ. उदय गुप्ताच्या भूमिकेत असून रकुल डॉ. फातिमाच्या भूमिकेत दिसेल. आयुष्मान व रकुल ही नवीनतम फ्रेश जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते व्यक्त करताहेत. मुख्यधारेच्या सिनेमात आपण पाहिलेल्या गोष्टींपेक्षा वेगळी संकल्पना या चित्रपटातून मांडण्यात येईल.
‘जंगली पिक्चर्स’ सोबत काम करण्याबद्दल रकुल म्हणाली, “‘डॉक्टर जी’ चा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साही आहे. या चित्रपटात मी प्रथमच आयुष्मान सोबत काम करतेय, जंगली सोबत पण पहिलाच चित्रपट आहे. त्याचप्रमाणे अनुभूती कश्यप सोबतही पहिलेच काम, त्यामुळे माझा आनंद त्रिगुणित झाला आहे. चित्रपटाची संहिता ऐकताच मी तिच्या प्रेमात पडले. वैद्यकीय नाट्य व ‘कॅम्पस’ कॉमेडी याचा उत्तम मिलाफ यात आहे. तसेच ही एक अतिशय रोचक संकल्पना आहे जी प्रेक्षकांसाठी ‘डॉक्टर’ संदर्भात नवीन दृष्टीकोन आणेल. मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीव्रतेने वाट बघतेय.”