मुंबई -गंगा हरजीवनदास काठियावाडी या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट संजय लीला भन्साली बनवत आहेत. एव्हाना चित्रपट प्रदर्शित होऊन गेलाही असता परंतु कोरोनाने सर्वच चित्रपटांची सर्वच वेळापत्रके बदलून टाकली. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून नुकताच अजय देवगण चित्रीकरणात सामील झाला. ज्याला गंगुबाई राखी बांधायची अशा करीम लालाची अजय भूमिका साकारत आहे. मुंबईचा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणारा कामाठीपुरा येथील ‘पिला हाऊस’ येथे गंगुबाईची हयात गेली. तिने तेथील मुलींना मनाविरुद्ध वेश्याव्यवसाय करू दिला नाही. वेश्यांच्या मुलांचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी तिने चळवळ उभारली तसेच लढाही दिला. याच कामाठीपुरा येथील रहिवाशांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल व त्या प्रदेशाबद्दल उलट सुलट दाखविण्यासाठी आक्षेप घेतला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्यावर खटला दाखल केल्याचे सुत्रांकडून समजत आहे. हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’वर आधारित आहे.
गंगुबाई षोडषा असताना आपल्या प्रियकराबरोबर मुंबईला पळून आली होती तिने लग्नही केले. परंतु तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांमध्ये कामाठीपुरा परिसरात विकले. तिला देहविक्रय करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु त्यादरम्यान अनेक कुख्यात गुंड तिच्या सान्निध्यात आले. एक तक्रार घेऊन ती करीम लालाकडे गेली असता ती त्याला राखी बांधून परतली. करीम लालने ‘भाऊबीज’ म्हणून त्याच्या अखत्यारीतला कामाठीपुरा इलाका तिच्या स्वाधीन केला व बेकायदेशीर व्यवसाय करीत तिने ‘कामाठीपुराची मॅडम’ ही बिरुदावली मिळविली. त्या परिसरातील पानही तिच्या इशाऱ्याशिवाय हलत नव्हते. कथानकातील काही भागाला कामाठीपुरा रहिवाशांच्या विरोध आहे. ते तर छातीठोकपणे सांगत आहेत की, त्यांच्या परिसरात कोणतेही बेकायदा कृत्य घडत नाही. चित्रपटातून नेमके उलटे दर्शविले असल्यामुळे येथील रहिवाशांची बदनामी होऊ शकते. त्यामुळेच ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटासंबंधित सर्वांना तेथील एका सामाजिक संस्थेतर्फे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, संजय लीला भन्साली, हुसेन झैदी आणि आलीय भट यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याही पुढे जात आलिया भटच्या घरासमोर निदर्शने करण्यात येणार होती. परंतु ही निदर्शने रद्द करण्यात आली असून त्यामागील आणि कायदेशीर नोटिशीसंदर्भातील कारणे कळू शकलेली नाहीत. या प्रकरणाला दुसरी बाजू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठलाही मोठा चित्रपट रिलीज व्हायला येतो तेव्हा तो चर्चेत राहणे गरजेचे असते. मनोरंजन सृष्टीत ‘एनी पब्लिसिटी इस गुड पब्लिसिटी’ हे ब्रीदवाक्य तंतोतंतपणे पाळले जाते. अलीकडच्या काळात ऐतिहासिक, राजकीय, बायोपिक चित्रपटांबाबतीत कुठली ना कुठली कॉंट्रोव्हर्सी होतच असते आणि बऱ्याचदा त्याचा चित्रपटाला फायदाच होतो. २०१७-१८ ला संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘पद्मावती/पद्मावत’ ला प्रखर विरोध झाला होता परंतु प्रदर्शित झाल्यावर त्याने ३००+ कोटींचा धंदा केला. याआधीही गंगुबाईच्या दत्तक मुलाने या चित्रपटावर व संबंधितांवर केस फाईल केली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे आणि त्यातच या चित्रपटाला प्रभासच्या ‘राधे श्याम’ सोबत दोन हात करावे लागणार आहेत. एकंदरीत अशा केसेस ‘आउट ऑफ कोर्ट’ सेटल केल्या जातात परंतु कामाठीपुरा रहिवाशांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटास फायदा होतो की नुकसान हे येणारा काळच सांगेल.