‘मुंबई अकादमी ऑफ मुविंग इमेजेस’ म्हणजेच ‘मामी’ हा एक प्रतिष्ठित, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गणला जाणारा, चित्रपट महोत्सव असून त्याचे आयोजन दरवर्षी मुंबईत केले जाते. चित्रपटसृष्टीतील नामांकित मंडळी याच्या बोर्डावर असून २०१९ मध्ये ‘मामी’ च्या अध्यक्षपदी ‘चेयरपर्सन’ म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोनची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षीचा कोरोना आघात आणि इतर अनेक अडचणीत आणणाऱ्या गोष्टींमुळे ‘माझ्याकडे चित्रपटांतील कामाचा भार वाढल्यामुळे मी ‘मामी’ साठी हवा तेव्हडा वेळ देऊ शकणार नाही’, असे म्हणत या एप्रिलमध्ये दीपिकाने त्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिच्या एव्हढ्या, किंवा अधिक, ताकदीचा कलाकार ‘मामी’च्या अध्यक्षपदी असावा असे सर्वांचे मत पडले. त्यानुसार ‘मामी’च्या अध्यक्षपदी नुकतीच ग्लोबल स्टार, यशस्वी निर्माती, लेखिका असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्रियांका चोप्रा जोनासची निवड झाली आहे.
प्रियांका चोप्रा जोनास जरी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी तिची नाळ भारताशी घट्ट जुळलेली आहे. तिने न्यूयॉर्क येथे यावर्षी सुरु केलेल्या ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये सबकुछ, अगदी स्ट्रीट-फूड सुद्धा, मेनू असून त्याबद्दल तिला अभिमान आहे आणि ती तिच्या हॉलिवूडमधील दोस्तमंडळींना तेथेच खाऊपिऊ घालते. ‘मामी’ बोर्डाने एकमताने प्रियांकाची निवड केली असून पुढील वर्षीच्या ‘मामी २.०’ या फेस्टिवल ची घोषणा देखील केली आहे. हा चित्रपट महोत्सव ११ ते १५ मार्च २०२२ दरम्यान मुंबईत होणार आहे आणि तोपर्यंत कोरोना संकट टळून चित्रपटसृष्टी पूर्वपदावर आलेली असेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली. ‘मामी’ च्या बोर्ड ऑफ ट्रस्टींमध्ये नीता अंबानी (को-चेयरपर्सन), अनुपमा चोप्रा (फेस्टिवल डिरेक्टर), अजय बिजली, आनंद जी महिंद्रा, फरहान अख्तर, ईशा अंबानी, कबीर खान, कौस्तुभ धवसे, किरण राव, राणा डगुबती, रितेश देशमुख, रोहन सिप्पी, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवाने, विशाल भारद्वाज आणि झोया अख्तर अशी तगडी सिनेमंडळी आहेत. या बोर्डाने प्रियांकासोबतच अजून दोन नवीन सदस्यांना सामील करून घेतले ते म्हणजे दिग्दर्शिका अंजली मेनन आणि फिल्ममेकर शिवेंद्र सिंग डुंगरपूर.