मुंबई - अभिनेत्री पायल घोष हिने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून चित्रपट निर्माते अनुराग कश्यपविरूद्ध दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रार प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. सोमवारी पायलने या पत्राची एक प्रत आपल्या ट्विटर शेअर केली. या प्रकरणाची चौकशी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे सांगत तिने राष्ट्रपतींकडे न्यायाची मागणी केली आहे.
पायलने आपल्या पत्रात लिहिलंय, "आदरणीय महोदय, मी पीडित आहे आणि मी आरोपींविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या बहाण्याने आरोपीने मला त्याच्या घरी बोलावले आणि त्यानंतर त्याने माझ्याबरोबर भयंकर अपराध केला. मी २२/०९/२०२० रोजी तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्यापपर्यंत तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. आरोपी हा खूप प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे पोलीस आरोपीला अटक करत नाहीत. एखाद्या गरीब व्यक्तीने हा गुन्हा केला असता तर त्याला त्वरित अटक केली गेली असती. न्याय मिळवण्यासाठी मी हात जोडून दरवाजा ठोठावत आहे. माझ्या बाबतीतल्या या प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप करावा आणि मला न्याय मिळावा यासाठी मदत करावी. ”