मुंबई- अभिनेत्री पायल घोषने निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपचे नाव न घेता त्याला 'गिधाड' म्हटले आहे. अलीकडेच पायलने कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पायल हिने कश्यपवरील आरोपांबाबत मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेतली.
पायल घोषने अनुराग कश्यपला म्हटले 'गिधाड' - पायल घोषने रेखा शर्मा यांची भेट घेतली
पायल घोषने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेतली. यानंतर तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये अनुराग कश्यपचे नाव न घेता त्याला गिधाड म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटल्यानंतर पायलने तिच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पायलने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल मी रेखा शर्मा मॅडम आणि राष्ट्रीय महिला आयोग यांचे मनापासून आभार मानते. जेव्हा काही महिलांनी गिधाडाची बाजू घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा या संघटनेने मला साथ दिली.''
पायल घोष हिने सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून आपल्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.