मुंबई - कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन दरम्यान अनेक चित्रपट डिजिटल रिलीजचा विचार करीत आहेत. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनाही हा निर्णय योग्य वाटतो. कोणत्याही माध्यमातून जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.
अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा यांचा 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट असेल किंवा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी केला आहे. त्यामुळे पारंपरिक थिएटरमध्ये चित्रपट रिलीज करण्याची परंपरा खंडीत होत आहे.
''मी एक अभिनेता आहे. आमचे मुख्य ध्येय असते सिनेमा बनवणे आणि आमच्या अभिनयाच्या मार्फत कोणत्याही माध्यामातून जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचणे. अर्थात मोठ्या स्क्रिनचा अनुभव हा वेगळाच असतो.'', असे पंकज त्रिपाठी म्हणाले.
पंकज त्रिपाठी यांनी गाजलेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजमध्ये गुरुजी ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी भर झाली. त्यांनी 'मिर्झापूर'मध्ये साकारलेला कलिन भैय्याही प्रेक्षकांना खूप भावला होता.
''थिएटरमधील अनुभव हा वेगळा असतो, कारण लोक एकत्रित समुहाने चित्रपट पाहतात. छोट्या स्क्रिनवर तुम्हा एकट्याने पाहात असत, असे नाही की थिएटर उघडणार नाहीत. आम्ही यापूर्वी या थिएटरच्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि त्यातून बाहेरही आलो आहोत.,'' असे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले. पंकज त्रिपाठी आगामी '८३' या कबीर खानच्या चित्रपटात काम करीत आहे.