मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाणा साधला असून हे म्हणजे अश्लिलता पसरवणारी जागा असल्याचे म्हटले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने इरॉस नाऊने पोस्ट शेअर केल्यानंतर रणवीर सिंग, सलमान आणि कॅटरिनाचे मीम्स तयार झाले. त्या पार्श्वभूमीवर कंगनाने ही प्रतिक्रिया दिली आहे.
इरॉसला टॅग करून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर कंगनाने लिहिलंय, ''आपल्या समुदायाला थिएटरमध्ये दाखवण्यालायक चित्रपटांचे संरक्षण केले पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर दाखवण्यासाठी आशय सामुग्रीला अश्लिल बनवणे आणि कलेचे प्रदर्शन करणे सोपे झाले आहे. असे असले तरी याच्या तुलनेत प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे खूप कठीण झाले आहे. हे सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म दुसरे काही नाही तर पॉर्न हब बनल्या आहेत. ही लज्जास्पद बाब आहे.''
एका वेगळ्या ट्वीटमध्ये ती लिहिते, "आणि हा फक्त स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा दोष नाही, जेव्हा तुम्ही एकटे बसून, कानात हेडफोन घालून काही पाहात असाल तर तुम्हाला त्वरित समाधान हवे असते. चित्रपट पूर्ण कुटुंब, मुले, शेजार पाजारी यांच्यासह पाहिला पाहिजे. मूळ स्वरुपात हा सामुदायिक अनुभव असायला हवा.''