मुंबई - इंडियन आयडॉलच्या नवव्या सिझनमध्ये परिक्षकांच्या खुर्चीत विराजमान झालेल्या अन्नु मलिकवर मीटू मोहिमेअंतर्गत आरोप झाले होते. तरीही त्यांची वर्णी परीक्षकपदी लागल्यानंतर काहीजणांनी आश्चर्य व्यक्त केलंय. सोना महापात्रा आणि नेहा भसिन यांनी सोशल मीडियावर याबाबत पत्रही लिहिले होते. आता अन्नु मलिक यांच्या बचावासाठी गायिका हेमा सरदेसाई मैदानात उतरली आहे. हेमाचे म्हणणे आहे की टाळी एका हाताने वाजत नाही.
हेमा सरदेसाई हे नाव 'चली चली फिर हवा चली' आणि चक दे इंडिया चित्रपटातील 'बादल पे पांव है' या गाण्यामुळे सर्वपरिचित झाले आहे.
हेमाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून अन्नु मलिकला पाठिंबा दर्शवला आहे. ती लिहिते, "काही वर्षापूर्वी इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा आपल्या सिध्दांताशी तडजोड करुन गाण्याचे काम करणार नाही हे मी ठरवले होते. त्यावेळी इतर गप्प का होते ? आणि इतक्या वर्षापर्यंत गप्प का आहेत? माझ्या ठामपणामुळेच मला अन्नु मलिक यांच्या सारख्या संगीतकारासोबत गायन करण्याची संधी मिळाली. माझ्यासारखी कलाकार जर त्यांच्यासोबत गायन करीत असेल, तर त्यांच्यात प्रतिभा ओळखण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच त्यांनी मला सन्मानाने गायन करु दिले."
टाळी एका हाताने वाजत नाही हे सांगताना हेमा म्हणते, "त्यांच्या विरोधात असलेल्या काही गायकांना मी याबद्दल विचारले की, इतकी वर्षे त्या गप्प का आहेत? ज्या संगीतकारांसोबत तुम्ही काम केले ते सर्व भगवान आहेत का? तुमच्या प्रसिध्दीसाठी जर आरोप करीत असाल तर ते योग्य नाही. मी असेच म्हणेन की टाळी एका हाताने वाजत नाही. जेव्हा इंडस्ट्रीतील काही सभ्य लोक याबद्दल बोलत आहेत तर इतरांनीही यावर बोलले पाहिजे."