मुंबई - राजकुमार हिरानी यांची दिग्दर्शनाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा पहिला चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस'ने अनेक प्रथितयश दिग्दर्शकांना अवाक केले आहे. त्यांची प्रसंगांची मांडणी आणि त्यांनी केलेली व्यक्तिरेखांची ठेवण अप्रतिम होती. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान 'मुन्नाभाई'च्या अवतारात दिसणार होता. परंतु, ती भूमिका संजय दत्तने साकारली. ती व्यक्तिरेखा संजयच्या पर्सनालिटीमध्ये इतकी योग्य बसली, की प्रेक्षक आता दुसऱ्या कुणालाही मुन्नाभाई म्हणून बघूच शकणार नाहीत. यात मोठा हात आहे राजकुमार हिरानी यांचा. त्यांच्या अफलातून प्रेझेंटेशनमुळे संजय दत्त आणि मुन्नाभाई अविभाज्य झाले. या चित्रपटापासून संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांच्यात इतकी घट्ट मैत्री झाली, की हिरानींना संजय दत्तच्या आयुष्याबद्दल संपूर्णतः कळले.
...आणि बनला संजू
त्यानंतर त्या दोघांनी मिळून 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट बनवला. तोही तूफान चालला. हिरानींना संजय दत्तच्या आयुष्यातील नाट्य चित्रपटासाठी खुणवू लागले आणि त्यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट बनवला. जेव्हा हा चित्रपट बनवायचे ठरले, तेव्हा संजय आणि राजू यांच्या संभाषणामधील बनवलेल्या नोंदी हजारेक पानांच्या झाल्या होत्या. त्यातून काही निवडक नाट्यप्रसंग घेऊन 'संजू'ची पटकथा बनवण्यात आली. अभिनेता रणबीर कपूरला जेव्हा संजय दत्तच्या भूमिकेसाठी निवडले होते, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु जेव्हा 'संजू'चा 'फर्स्ट लूक' बाहेर आला तेव्हा सर्वचजण, फिल्म इंडस्ट्रीतलेसुद्धा अवाक झाले होते. रणबीरने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि राजकुमार हिरानी यांचे 'व्हिजन' इतके जबरदस्त निघाले की रणबीर थेट संजूच दिसत होता.
रणबीरला वडिलांची आदरयुक्त भीती
जेव्हा संजू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित व्हायचा होता, तेव्हा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांनी आधी रणबीरचे वडिल दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना दाखविला होता. आश्चर्य म्हणजे ऋषी कपूर यांनी आपल्या मुलाला ओळखलेच नाही. इतका तो पडद्यावर संजय दत्तसारखा दिसत होता. ते खूप भावुकही झाले होते. यावेळी बाजूला बसलेल्या पत्नी नीतू कपूरला सांगितले, की 'त्याला हे सांगू नकोस की मी त्याची स्तुती करत होतो. अजून त्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे'. रणबीर कपूरला आपल्या वडिलांबद्दल नेहमीच आदरयुक्त भीती होती. परंतु यावरून कळले असेलच की रणबीर कपूरने 'संजू'साठी केलेले परिवर्तन किती पर्फेक्ट होते.
'एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलेला माणूस'