मुंबई -बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांना गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नसीरुद्दीन यांना निमोनिया झाल्याची माहिती आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. शाह यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. त्यांच्या फुफ्फुसात एक पॅच सापडला असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे मॅनेजरने सांगितले.
नसीरूद्दीन यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी रत्ना पाठक शाह आणि मुले त्यांच्यासोबत आहेत. शाह यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आहे. यापूर्वीही अनेकदा नसिरुद्दीन रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, स्वतः शाह यांनीच अफवांचे खंडन केले होते.
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती निर्माता राज कौशल यांचे निधन -
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं निधन झाले आहे. निर्माता आणि स्टंट डायरेक्टर असलेल्या राज कौशल यांचे ३० जूनला सकाळी निधन झाले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. राज कौशल (#MandiraBedi) यांच्या निधनाची बातमी समजताच, संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलीप कुमार पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल -
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना सुद्धा पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. काल रात्री सावधगिरीचा उपाय म्हणून धाप लागण्याच्या तक्रारीनंतर मुंबई येथील खार रोड येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले गेले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या जवळपास दोन आठवड्यांनंतर दिलीप कुमार यांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक नसीरुद्दीन शाह -
नसीरुद्दीन शाह हे भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक मानले जातात. ते भारतीय समांतर सिनेमातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत. मुख्य प्रवाहातील चित्रपट तसेच आर्ट फिल्ममध्ये या दोन्ही मुख्य प्रवाहातही ते यशस्वी आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी शहरात जन्मलेल्या नसीरुद्दीन यांनी 1975 मध्ये श्याम बेनेगलच्या निशांत चित्रपटांतून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित केले आहे.
नसीरुद्दीन यांनी दूरदर्शन उद्योगातही काम केले आहे. कवी गुलजार यांनी लिहिलेल्या व निर्मित टीव्ही मालिका मिर्झा गालिब मधील त्यांची कामगिरी आजही त्यांचा उल्लेखनीय म्हणून आठवली जाते. 'द मराठा किंग शिवाजी', 'तार्काश' या 'टेलिव्हिजन' मालिकेमध्ये त्यांनी भूमिका केल्या. चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये त्यांनी कारकिर्द गाजवली असली तरी नाट्यक्षेत्रातील त्यांची कारकिर्द भव्य आहे. नसीरुद्दीन शाह यांनी परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रात अतुलनीय योगदान देऊन प्रेक्षकांना वारंवार आश्चर्यचकित केले आहे.