मुंबई- निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि पियुष सिंह यांनी चंद्रमुखी या मराठी सिनेमाची घोषणा केली होती. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर बनणारा हा पहिला मोठ्या बॅनरचा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या एबी अँड सीडी या मराठी चित्रपटानंतर चंद्रमुखी या चित्रपटासाठी बर्दापूरकर आणि पियुष सिंह तिसऱ्यांदा एकत्र चित्रपट बनवत आहेत. जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे पोस्टर धुमधडाक्याच लॉन्च करण्यात आले होते.
अक्षय विलास बर्दापूरकर यांची निर्मिती असलेल्या 'चंद्रमुखी'चे दिग्दर्शन प्रसाद ओक करीत आहेत. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो यांची ही निर्मिती आहे.
हेही वाचा - अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण
मराठीतील नामवंत कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राजकारणी नेते आणि तमाशा बारीचा यात विषय हाताळण्यात आलाय. या चित्रपटात कोण कलाकार काम करीत आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चिन्मय मांडलेकर या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिणार आहेत.
या चित्रपटात चंद्रमुखी या तमाशा कलावंतीणीची गोष्ट मांडण्यात आली असली तरी अद्यापही यात कोण अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीने मारला 'वडापाव'वर ताव
चंद्रमुखी चित्रपटाचे शूटिंग प्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या उपस्थितीत सुरू झाले आहे. सिनेमाच्या मुहूर्ताचा शॉट भायखळा येथील मसिना हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. यावेळी निर्मात्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. अजय-अतुल यांचे संगीत या सिनेमात असल्यामुळे बहारदार लावण्यांची पर्वणीच जणू प्रेक्षकांसाठी पाहायला मिळणार आहे.