मुंबई - बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अपेक्षेप्रमाणे भव्य सेट्स, युध्दाचे आक्रमक प्रसंग, डायलॉगबाजी, अॅक्शन आणि लव्हस्टोरी यांचा मिलाफ यामध्ये असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. ट्रेलर प्रसिध्द झाल्यापासून प्रेक्षकांनी पाहण्यासाठी अतुरता दाखवली असून जोरदार प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
काही ट्रेलर दुसऱ्यांदा पाहावे असे वाटतात, कारण एकदा पाहून मन भरत नाही. नेमका असाच हा पानीपतचा ट्रेलर आहे. या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवण्यात यश मिळवलंय.
पानीपत चित्रपटात अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवभाऊंची भूमिका अपेक्षित उंची गाठताना दिसत आहे. पार्वतीबाईच्या भूमिकेतील क्रिती सेननला पाहताना बाजीराव मस्तानीतील काशीबाईची आठवण होते. तर संजय दत्तने उभा केलेला अब्दाली जबरदस्त आहे.
आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन असलेला हा ऐतिहासिक चित्रपट गोवारीकरांसाठी खूपच प्रतिष्ठेचा बनला आहे. लगान चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर गोवारीकरांबद्दच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. मात्र त्या तोडीची कलाकृती त्यांच्याकडून झालेली नव्हती. मोहेन्जोदारो हा चित्रपटाही फ्लॉप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पानीपतकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत.
येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय सिनेमाची निर्मिती करणाऱ्या रिलायन्स एंटरटेनमेंटने घेतला आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण बादशहा मोहम्मद शहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मराठा साम्राज्याच मोठं नुकसान झालं होतं. जवळपास 1 लाख मराठे या युद्धात मारले गेले. मात्र, त्यासोबतच देशाच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळाली. यावर या सिनेमाद्वारे भाष्य करण्यात येणार आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेलटकर आणि सुनीता गोवारीकर यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. सुरुवातीपासूनच या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. ट्रेलर पाहताना ऍक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचीही जोड मिळाल्याचे स्पष्ट दिसून येते.