मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला १४ वर्षे जुन्या चुंबन प्रकरणात ( Shilpa Shetty Kissing Case ) दिलासा मिळाला आहे. तिच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप होता. 2007 मध्ये हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे ( Hollywood actor Richard Gere ) यांनी एका कार्यक्रमात शिल्पा शेट्टीचे खुलेआम चुंबन घेतले होते. त्यानंतर त्याचे हे चुंबन अनेक वादात सापडले होते. रिचर्ड गेरे आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता या प्रकरणी अभिनेत्रीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण ( Magistrate Ketki Chavan ) यांनी शिल्पा शेट्टीची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायदंडाधिकारी म्हणाले की, या प्रकरणात अभिनेत्री आरोपी नसून रिचर्ड गेरेची पीडित आहे. दंडाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिल्पा शेट्टीवरील आरोप निराधार आहेत. त्यामुळे अभिनेत्रीची आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
दंडाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, तक्रारीत शिल्पा शेट्टीचा कोणत्याही प्रकारचा गुन्हेगार असल्याचे आढळून आलेले नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रिचर्ड गेरेने 2007 मध्ये शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले तेव्हा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. या घटनेनंतर राजस्थानमधील मुंडावार येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती, जी मंजूर करण्यात आली.