मुंबई- निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्यावर मूत्राशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया झाली असून आता कर्करोगमुक्त झालो असल्याचे म्हटले आहे. 63 वर्षीय मांजरेकर यांनी सांगितले की, सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या भूमिका असलेल्या 'अंतिम म: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना कर्करोगाचे निदान झाले होते.
"अंतिमच्या शूटिंग दरम्यान, माझे कर्करोगाचे निदान झाले, त्यावेळी चित्रपटाचा शेवटचा भाग शूट करीत होतो आणि त्यानंतर मी केमोथेरपी घेतली. आज मला तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी कर्करोगमुक्त आहे," असे मांजरेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
अंतिम चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर बोलत होते. यावेळी सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा उपस्थित होता.
केमोथेरपी सुरू असताना चित्रपटाचे चित्रीकरण करणे कठीण होते का, असे विचारले असता, मांजरेकर म्हणाले की, या प्रक्रियेचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही हे भाग्यच आहे. "मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी मला प्रथम केमोथेरपी घ्यावी लागली. शूटिंगदरम्यान, मी केमोथेरपीखाली होतो पण त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही. मला हे जाणवले की तुमचे आवडते काम तुम्हाला प्रेरित करते. मी नेहमी सकारात्मक विचार करतो."