मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट 'महाराजा' पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे. कारण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधातून महाराष्ट्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुन्हा शूटिंग सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार असलेल्या जुनैदने १५ फेब्रुवारीपासून आपल्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. दोन महिने शूटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी 14 एप्रिलपासून राज्यभरात 15 दिवसाचे कर्फ्यू आणि लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि शूटिंग थांबवण्यात आले.
चित्रपट आणि टेलिव्हिजन शूट पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी दिशानिर्देशांचा अवलंब करीत 'महाराजा' चित्रपटाचे शूटिंग आता पुन्हा सुरू होऊ शकेल. यासाठी टीम बायो-बबल तयार करणार असून रोज आठ तासातच शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, टीमने आजपासून मुंबईच्या मरोलमध्ये तयार केलेल्या सेटवर शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.