मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार लपवालपवी करत असून, त्यांना कंगनाची का भीती वाटतेय, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. संजय राऊत आणि कंगना रनौत यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर कदम बोलत होते.
"सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना रनौतला धमकावण्याचे दुःसाहस केलंय. की कंगनानं मुंबईत येऊ नये..का कंगनानं मुंबईत येऊ नये? कंगनाच्या मुंबईत येण्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला इतकी भीती वाटण्याचे कारण काय?", असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
कंगनाची भीती महाराष्ट्र सरकारला वाटतंय असेही ते म्हणाले. राम कदम म्हणतात, "वास्तविक मोठ्या साहसाने ते कोण नेते, अभिनेते, ड्रग माफिया, बॉलिवूड सगळ्यांची नावांची ती पर्दापाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचं महाराष्ट्र सरकारनं स्वागत करायचं सोडून तिला धमकी देताय. कंगनाच्या मुखातून ती नावं निघू नयेत आणि ती नावं निघालीत तर महाराष्ट्र सरकार अडचणीत येईल, ही खरी महाराष्ट्र सरकारची भीती आहे. म्हणून कंगनाला धमकावणं, हे महाराष्ट्र सरकारच्या भितीपोटी झालेलं कृत्य आहे."
राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारवर अनेक ताशेरे ओढले आहेत. राम कदम पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या सरकारनं एक गोष्ट लक्षात ठेवावी. कंगना झाशीची राणी आहे, ती एकटी नाही. तिच्यासोबत अखंड देश उभा आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने महाराष्ट्र सकारची लपवालपवी अडीच महिने देश पाहतो आहे, ही लपवालपवी सरकार का करत आहे, याची उत्तरं द्यावी लागतील."