चेन्नई - केवळ रिल हिरो नाही तरी खऱ्या आयुष्यात रिअल हिरो बनण्याचा सल्ला मद्रास हायकोर्टाने सुपरस्टार विजयला दिलाय. विजयने इंग्लंडमधून रोल्स रॉयल्स घोस्ट ही कार आयात केली होती. यावर असलेल्या करात सवलत मिळावी यासाठी त्याने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाने विजयची याचिका फेटाळून लावत एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. दोन आठवड्याच्या आत प्रवेश कर भरण्याचे निर्देश न्यायमुर्ती एस. एम. सुब्रमण्यम दिले आहेत. दंडाची रक्कम तामिळनाडू मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडाला देण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे.
एंट्री टॅक्स भरण्याच्या कायदेशीर लढाईत विजयला मोठा धक्का बसला आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विजयने आपल्या याचिकेत असा दावा केला होता की, त्याच्या घोस्ट मॉडेल रोल्स रॉयसवर असामान्य प्रवेश कर लादला गेला आहे. संबंधित अधिकाऱयाने प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्याला जास्त भुर्दंड पडल्याचे त्याचे म्हणणे होते. म्हणूनच, त्याने या याचिकेमार्फत कर माफीची मागणी केली होती.
न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले की प्रतिष्ठित अभिनेता असल्याने विजयने त्वरित व वेळेवर कर भरणे अपेक्षित होते. कारण ही एक ऐच्छिक देय रक्कम किंवा देणगी नव्हे तर एक अनिवार्य योगदान आहे. “रिट याचिका दाखल करणे, एन्ट्री टॅक्स भरणे टाळणे आणि रिट याचिका सुमारे नऊ वर्षे ठेवणे या गोष्टींचे कधीच कौतुक होऊ शकत नाही,” असेही कोर्टाने म्हटले आहे.