मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना' रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. याची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमा थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे हा सिनेमा कधी रिलीज होणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्यात आहे.
'गुंजन सक्सेना' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्याचा निर्णय निर्माता करण जोहरने घेतलाय. करणने एक व्हिडिओ शेअर करीत लिहिलंय, ''तिच्या प्रेरणादायक प्रवासाने इतिहास रचला. ही तिची कहाणी आहे. गुंजन सक्सेना - द करगिल गर्ल, लवकरच येत आहे नेटफ्लिक्सवर."
करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडिओच्या व्हाईस ओव्हरमध्ये जान्हवी बोलताना दिसते, ती म्हणते, ''गुंजन सक्सेना, लखनौची एक छोटीसी मुलगी. जिचे एक मोठे स्वप्न होते. मोठी होऊन पायलट बनण्याचे. परंतु जग विचार करतंय की, मुली गाडी चालवू शकणार नाही, तर मग गुंजन विमान उडवू शकेल? त्या वेडीला जगाची पर्वा नव्हती, फक्त आपल्या बाबावर विश्वास होता. जे म्हणायचे विमान मुलगा उडवू दे किंवा मुलगी त्याला पायलटच म्हणतात.''
व्हिडिओसोबत करणने एक पोस्टरही शेअर केलंय. ज्यात गुंजन सक्सेना हेलिकॉप्टर उडवताना दिसत आहे. जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनला आहे. यात पंकज त्रिपाठीचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट इंडियन एयरफोर्स पायलट गुंजन सक्सेनाचा बायोपिक आहे. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युध्दात पहिली विमान उडवणारी ती महिला पायलट होती.
यापूर्वीही काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा मोस्ट अवेटेड 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट येत्या १२ जूनला अमॅझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.